डाळिंब मररोग



डाळिंबातील मररोग - इत्यंभूत माहिती - श्री सुशांत सुर्वे 

डाळिंबातील मर रोग**
सुशांत हिरालाल सुर्वे
जयकिसान कृषी सेवा केंद्र चिखली संगमनेर
फोन: ७७-२००९-२०११

डाळिंबातील मररोग, तेल्या रोग हे प्रामुख्याने दोन रोग अनेक डाळिंबबागायतदारांना आपल्या बागा लवकरात लवकर उपटविण्यास भाग पाडतात.

आज या तेल्या रोग व मर रोगावर १००% कोणताही उपचार नाही. पण त्यांचा प्रसार थांबविणेही अशक्य नाही. अनेक लोक बागेतील या रोगांमुळे त्रासले आहे व आपल्या बागा उपटण्याच्या तयारीत आहे.
मित्रांनो, माझ्या या क्षेत्रातील अनुभवावरून मला असं लक्षात आले कि...डाळिंबाची लागवड जेवढी झपाट्याने वाढत आहे... त्याच प्रमाणात डाळिंबाचे झाडे उपटणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. मागच्या वर्षी पण खूप लोकांनी आपल्या बागा जमीनदोस्त केल्या.

तेल्या व मररोग या दोन रोगांमुळे बागा उपटल्या गेल्या परिणामी यंदा डाळिंबाला मागणी जादा व उपलब्धता कमी प्रमाणात यामुळे उच्चांकी असे भाव ४-६ महिने टिकून राहिले. अगदी मार्च एप्रिल मे महिन्यात एकाच डाळिंब बागेवर दिवसातून तीन ते चार व्यापारी जाऊन यायचे.

** डाळिंब बागायतदारांनी हे समजून घेणे गरचेचे आहे कि डाळिंबातील तेल्या व मररोगामुळेच डाळिंबाला बाजार आहे. एकदा कि या दोन रोगांवर उपचार सापडला कि डाळिंबाचे हाल कांद्यासारखे होण्यास वेळ लागणार नाही.महाराष्ट्र कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश राजस्थान सर्वच ठिकाणी डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणांत वाढली आहे पण बागेतील समस्या मात्र त्याच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांइतके डाळिंब बागेतील ज्ञान अजून दुसर्या राज्यात तेवढ्या प्रमाणात नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील डाळिंबाची क्वालिटी चांगली व भाव चांगला मिळून जातो.

मररोग मुळे बागेतील १०-२०% झाडे गेली तरी लोक संपूर्ण बाग उपटून टाकतात. पण लगेचच पुढचा वर्षी बाजार वाढले तर उगाच बाग उपटून टाकली असा पश्चाताप करत बसतात. जी झाडे मोठे होऊन फळ धरण्यासाठी १.५ वर्ष वाट पहिली ती झाडे लगेच ३ वर्षी उपटून टाकणे वेडेपणा ठरतो.
डाळिंब बागेइतकं शाश्वत उत्पन्न तुम्हांला कोणतेही इतर पीक देऊ शकत नाही हे पण तितकंच खरं आहे. म्हणून थोडासा संयम व चांगला सल्ला घेऊन आपल्या बागेचं नियोजन करत जावे.

डाळिंबावरील तेल्या या रोगावर मागच्या लेखात माहिती दिली त्याला आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार.

आता आपण थोडं मररोगाविषयी बोलू.
डाळिंब बागेत झाडे मुखत्वे ३ कारणांमुळे मरतात.
१) मररोग ( फुज्यरिअम विल्ट )
२) सूत्रकृमी ( निम्याटोड )
३) खोडकिडे ( सुरश्या )

आपल्या बागेत नेमकी वरीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाडे जातात हेच अनेक शेतकऱयांना कळत नाही. त्यामुळे त्यावर नीट उपाययोजना करता येत नाही. मी असेही काही शेतकरी पाहिले आहेत कि ज्यांच्या बागेत बरेचदा मररोगामुळे झाडे मरतात व शेतकरी सुरश्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरो व नुवानाने खोडे धुत बसतात. मररोग हि बुरशी आहे तिला वरील कीटकनाशकांने काहीही परिणाम होत नाही.
तरी आपल्या बागेतील झाडे कोणत्या प्रकाराने जातात यासाठी पुढील लक्षणे तपासावीत.

१) मररोग लक्षणे:
- झाडाची एक फांदी पिवळी पडते. त्या फांदीची पाने गळत नाहीत. नंतर पूर्ण फांदी वाळून जाते.
- एक फांदी पिवळी पडून नंतर सर्वच झाड वाळून जाते. झाडावरील फळे पण वाळून तडकून जातात.

उपाय:
बहुतेक करून या प्रकाराने बऱ्याच डाळिंब बागेतील झाडे जातात.
या साठी,
मररोगाने पिवळ्या झालेल्या प्रत्येक झाडासाठी ८-१० लिटर पाणी घेऊन त्यात प्रोपीकोनॅझोल(टिल्ट)- २ मिली प्रति लिटर + क्लोरोपायरीफॉस ५०%(हमला) - ५ मिली हे मिश्रण झाडाच्या खोडाजवळ सर्व बाजूने ओतावे.
हा प्रयोग महिन्यातून दोनदा करावा.
तसेच बहार धरताना व प्रत्येक महिन्याला ५०० मिली टिल्ट व १ लिटर हमला प्रति एकर ड्रिपवाटे सोडून द्यावे.
मररोग हा बुरशीजन्य रोग आहे त्यामुळे खाली सूत्रकृमी सांगितलेल्या उपाययोजना या रोगासाठी देखील लागू होतील.

२) सूत्रकृमी (निम्याटोड)
लक्षणे:
झाडाच्या मुळ्यांवर सूत्रकृमी च्या गाठी दिसतात. झाडांची व फळांची वाढ खुंटली जाते.
उपाय:
सूत्रकृमी कंट्रोल करण्यासाठी अनेक औषध बाजारात उपलब्ध आहे. बक्कळ असं मार्केट या औषधांसाठी आहे.पण साध्या अशा प्रयोगांने निम्याटोड नाहीसा करता येऊ शकतो.
या साठी २०० लिटर पाणी चा एका टाकीमध्ये,

५ लिटर ट्रायकोडर्मा ५ लिटर ताक ५ किलो काळा गुळ ५ लिटर गोमूत्र

या प्रमाणात घ्या. वरील मिश्रण एक २ दिवस भिजू द्या. प्रत्येक दिवशी टाकीत एक लाकडी काठी टाकून मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हलवावे. दुसऱ्या दिवशी या टाकीतील १८० लिटर पाणी ड्रीपवाटे बागेला सोडा व २० लिटर तसेच टाकीत ठेवा. या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी व गूळ गोमूत्र ताक वरील प्रमाणात परत टाका. ट्रायकोडर्मा परत टाकण्याची गरज नाही. परत १८० लिटर ड्रिपवाटे सोडून द्या व २० लिटर परत बाकी ठेवा. व शेवटच्या वेळी पूर्ण २०० लिटर स्लरी सोडून द्या.
असा प्रयोग केल्याने निम्याटोड १००% कंट्रोल होईल. तसेच बागेला शेणखत भरतेवेळी त्यात ट्रायकोडर्मा टाकून त्यावर गुळाचे पाणी शिंपडल्याने निम्याटोड ला खाणार्या ट्रायकोडर्मा बुरशीची शेणखतात चांगली वाढ होते व असे खत बागेला भरल्याने निम्याटोड चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो.

३) खोडकिडा ( सुरश्या )
लक्षण:
बऱ्याचदा खोडकिडा व मररोग यामध्ये शेतकऱ्यांची गल्लत होते. खोडकिडा असेल तर झाडाच्या खोडावर टाचणीने टोचल्याइतके बारीक छिद्रे असतात व या छिद्रांतून खोडाची पावडर बाहेर पडते.
खोडाला घेरू चोळलेला असेल तर खोडकिड्याला थोडा प्रतिबंध मिळतो व खोडातून पडलेली पावडर स्पष्टपणे दिसल्यामुळे वेळीच उपाययोजना करता येतात.

उपाययोजना:
खोडकिड्यासाठी महिन्यातून एकदा क्लोरोपायरीफॉस ५०%(हमला) -२.५ मिली प्रति लिटर + नुवान २.५ मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी घ्यावी.
खोडाला घेरूपेस्ट लावावी.
*अगदी साध्या प्रयोगांनी वरील तीनही प्रकारचे रोग आटोक्यात येतात.
गरज आहे ती फक्त सूक्ष्म निरीक्षणाची, योग्य सल्ल्याची व काटेकोर नियमित नियोजनाची.
धन्यवाद...
सुशांत हिरालाल सुर्वे
जयकिसान कृषी सेवा केंद्र चिखली संगमनेर
फोन/व्हाट्सअँप: ७७-२००९-२०११

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.